TRENDING:

7,00,00,00,00,000 रुपये बुडाले; शेअर बाजारातील गुंतवणूकदार रडकुंडीला, अखेरच्या एका तासात असं काय झालं?

Last Updated:

Stock Market: गुरुवारी शेअर बाजारात अचानक आलेल्या विक्रीच्या तडाख्याने सेन्सेक्स 1,200 हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीतही मोठी घसरण झाली. या घडामोडीत गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले.

advertisement
मुंबई: गुरुवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का बसला. आठवड्याच्या चौथ्या व्यवहार दिवशी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात उघडले होते. मात्र काही वेळातच चित्र पालटले आणि शेवटच्या तासात तर अक्षरशः विक्रीचा महापूर उसळला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स तब्बल 1200 हून अधिक अंकांनी कोसळत 82,498 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 365 अंकांच्या घसरणीसह 25,454.35 वर स्थिरावला. या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीतून तब्बल 7 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पुसली गेली.
News18
News18
advertisement

सेन्सेक्स 83,969 या पातळीवर उघडला होता. सुरुवातीला काही प्रमाणात तेजी दिसली, परंतु नंतर विक्रीचा दबाव वाढत गेला. अखेरीस तो 1,236.11 अंकांनी घसरून 82,498 वर बंद झाला. यापूर्वीच्या सत्रात तो 83,734.25 वर बंद झाला होता. निफ्टीनेही 25,873 वर सुरुवात केली होती. मात्र दिवसभरातील घसरणीनंतर तो 365 अंकांनी खाली येत 25,454.35 वर बंद झाला. बुधवारी निफ्टी 25,819 वर बंद झाला होता.

advertisement

या घसरणीचा सर्वात मोठा फटका गुंतवणूकदारांच्या संपत्तीला बसला. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 472 लाख कोटी रुपयांवरून घसरत सुमारे 465 लाख कोटी रुपयांपर्यंत आले. म्हणजेच एका दिवसात 7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती बाजारातून नाहीशी झाली.

बाजारात हाहाकार माजण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला. मोठ्या प्रमाणावर नफावसूली (प्रॉफिट बुकिंग) झाली, ज्यामुळे निर्देशांकांवर दबाव वाढला. बँकिंग, मेटल, ऑटो यांसह अनेक क्षेत्रांतील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसला. आयटी शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. त्याचबरोबर अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढही बाजारातील अस्थिरतेचे एक कारण मानली जात आहे.

advertisement

या घसरणीत देशातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही टिकू शकले नाहीत. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज, गौतम अडाणींची अडाणी पोर्ट्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले. लार्जकॅप गटात इंडिगो (3.23%), एम अँड एम (2.97%), ट्रेंट (2.89%), बीईएल (2.70%), अडाणी पोर्ट्स (2.50%), कोटक बँक (2.29%) आणि रिलायन्स (2.11%) या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली. मिडकॅप गटात हिंदुस्तान पेट्रोलियम (4.95%), पेटीएम (4.51%) आणि गोदरेज प्रॉपर्टीज (3.50%) या शेअर्समध्येही मोठी पडझड झाली.

advertisement

गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा ठरला. तेजीच्या आशेने सुरुवात झालेला दिवस मोठ्या घसरणीत संपला आणि गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका बसला. पुढील सत्रात बाजार स्थिरावतो की आणखी दबाव वाढतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
7,00,00,00,00,000 रुपये बुडाले; शेअर बाजारातील गुंतवणूकदार रडकुंडीला, अखेरच्या एका तासात असं काय झालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल