मुंबई: भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने गुंतवणूकदारांना एका नवीन प्रकारच्या फसवणुकीबद्दल अलर्ट केले आहे. 'सेबी' चे अधिकारी असल्याचा दावा करणारे फसवणूक करणारे (fraudsters) संदेश आणि पत्रे पाठवून गुंतवणूकदारांकडून पैसे मागत आहेत, असे सेबीने म्हटले आहे. या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन सेबीने केले आहे.
advertisement
बनावट लेटरहेडचा वापर
सेबीने दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करणारे सेबीच्या अधिकाऱ्यांची नावे, त्यांची कार्यालये आणि ईमेलचा वापर करून गुंतवणूकदारांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सेबीच्या बनावट लेटरहेड, लोगो आणि शिक्क्याचा वापर करून गुंतवणूकदारांना पत्रे पाठवत आहेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही दंड भरण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्याच्या नावाखाली नोटिसा पाठवल्या जात आहेत. पैसे न भरल्यास सेबी कठोर कारवाई करेल, अशी धमकीही या नोटिसांमध्ये दिली जात आहे.
अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या
फसवणूक करणारे सेबीच्या बनावट पत्रांचा वापर करून गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात. या पत्रांमध्ये ते दावा करतात की ते सेबीने अधिकृत केलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे सांगत आहेत. एका प्रकरणात सेबीचे बनावट लेटरहेड असलेले एक प्रमाणपत्र आढळले. ज्यावर सेबीच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या होत्या.
सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती
सेबीने एका निवेदनात म्हटले आहे की, भोळे-भाबडे गुंतवणूकदार अशा फसवणुकीला बळी पडत आहेत. ते आपली कष्टाची कमाई गमावत आहेत. कारण ते फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करत आहेत. सेबीने गुंतवणूकदारांना अशा संदेशांपासून आणि पत्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सेबीने कोणतीही कारवाई केल्यास, त्याची सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच पेमेंटसाठी सेबीचे स्वतंत्र पोर्टल आहे आणि तेथे सेबीच्या अधिकाऱ्यांचे संपर्क तपशीलही उपलब्ध आहेत.
तपासणी करण्याचे आवाहन
सेबीने म्हटले आहे की, जर एखाद्या गुंतवणूकदाराला कोणताही संशयास्पद संदेश किंवा ईमेल प्राप्त झाला तर त्यांनी सेबीच्या वेबसाइटवर त्याची सत्यता तपासली पाहिजे. तज्ञांनीही गुंतवणूकदारांना कोणत्याही पत्राला घाईघाईने उत्तर न देण्याचा सल्ला दिला आहे. जर सेबीच्या नावाने पैशांची मागणी केली जात असेल तर अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सेबीच्या प्रत्येक निर्णयाची माहिती माध्यमांमध्येही येत असते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी माध्यमांमध्येही अशा माहितीची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.