ही तेजी नैसर्गिक नाही, तर सट्टेबाजी?
अमित गोयल यांच्या मते, चांदीच्या किमतीत सध्या जी वाढ दिसतेय, त्याचा वास्तवाशी फारसा संबंध राहिलेला नाही. सामान्यतः सोन्या-चांदीचे भाव डॉलरच्या हालचालीवर चालतात, पण आता चांदी कोणत्याही नियमात बसत नाहीये. ही परिस्थिती २००० सालच्या 'डॉट कॉम' संकटासारखी किंवा २००८ मधल्या कच्च्या तेलाच्या अवास्तव दरवाढीसारखीच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोक चांदीत गुंतवणूक करत आहेत म्हणून भाव वाढत नाहीयेत, तर केवळ सट्टेबाजीमुळे हे घडत आहे. चीनने चांदीच्या निर्यातीवर बंदी घातली, या साध्या बातमीला १० पटीने वाढवून सांगण्यात आलं आणि त्यातून हा बबल तयार झाला आहे.
advertisement
६० टक्के घसरण म्हणजे नेमकं काय?
गोयल यांचा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूकदारांना मोठे धक्के बसू शकतात. फेब्रुवारीपर्यंत चांदीचा भाव १०० डॉलरपर्यंत जाऊ शकतो, पण तोच टॉप असेल. एकदा का हा शिखर गाठला, की तिथून किमती ५० ते ६० टक्क्यांनी घसरतील. समजा, २.५४ लाख हा चांदीचा उच्चांक धरला, तर तिथून ६०% घसरण म्हणजे चांदीचा भाव १.५२ लाखांपर्यंत खाली येऊ शकतो. ही पडझड एका झटक्यात होणार नाही, तर पुढच्या एक ते दीड वर्षात हळूहळू होईल.
अमित गोयल यांनी १९८० सालच्या मोठ्या क्रॅशची आठवण करून दिली. सध्या बाजारात ब्लूमबर्ग ग्रीड इंडिकेटर सांगतोय की, लोक चांदीच्या बाबतीत प्रमाणाबाहेर लोभी झाले आहेत. जेव्हा जेव्हा बाजारात असा 'ओव्हर कॉन्फिडन्स' येतो, तेव्हाच मोठा क्रॅश होतो, असा इतिहास आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं तर, गोल्ड-सिल्व्हर रेशोमध्ये झालेली मोठी बदल ही सुद्धा एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते.
ज्यांनी चांदीमध्ये आत्ता मोठी रक्कम लावली आहे किंवा लावण्याचा विचार करत आहेत, त्यांनी सावध राहिलेलं बरं. तेजी पाहून भुलून जाण्यापेक्षा, ही तेजी टिकणारी आहे का? याचा विचार करा. कारण जेव्हा असा 'बबल' फुटतो, तेव्हा नफा जितका मोठा दिसतो, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त नुकसान सोसावं लागतं. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
