बचत, गुंतवणुकीबाबत विचार करताना रिटर्न अर्थात परतावा आणि पैशांची सुरक्षितता या दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. आज बचत, गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात एसआयपी आणि आरडी हे पर्याय तुलनेने अधिक चांगले मानले जातात. यापैकी कोणता पर्याय निवडावा असा प्रश्न मनात असेल. त्याचं उत्तर मिळण्यासाठी या दोन्हींमधला फरक माहिती असणं गरजेचं आहे.
advertisement
आवर्ती ठेव किंवा आरडी हे बँकांकडून दिले जाणारे एक आर्थिक साधन आहे. यात तुम्ही ठराविक कालावधीसाठी नियमित अंतराने निश्चित रक्कम जमा करू शकता. आरडी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. अल्पकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक आदर्श योजना आहे.
एसआयपी हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. या आधारे व्यक्ती म्युच्यु्अल फंडात नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवू शकते. यात तुम्ही मासिक किंवा तिमाही आधारावर बाजारात पैसे गुंतवू शकता. एसआयपी आवर्ती ठेवीप्रमाणे काम करते. यात ठरावीक रक्कम नियमितपणे वेळेनुसार गुंतवली जाते.
गुंतवणूकदार नियमित कालावधीसाठी (मासिक, तिमाही किंवा सहामाही) एक निश्चित रक्कम आरडीला जोडलेल्या बँक खात्यात जमा करू शकतो. दुसरीकडे गुंतवणूकदार निश्चित कालावधीसाठी (साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक) म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करतो. गुंतवलेली रक्कम सध्याची नेट अॅसेट व्हॅल्यू अर्थात एनएव्हीवर निवडलेल्या फंडाची युनिट्स खरेदी करते.
आरडीचे व्याजदर निश्चित असतात. ते सामान्यतः 5 टक्के ते 9 टक्क्यांदरम्यान असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर थोडे (अर्धा टक्का) जास्त असू शकतात. हे दर संपूर्ण कालावधीसाठी कायम असतात. एसआयपीत रिटर्नची खात्री नसते. निवडलेला म्युच्युअल फंड प्रकार (इक्विटी किंवा डेट) आणि बाजाराची स्थिती यानुसार यात चढ-उतार होऊ शकतो; पण इक्विटी एसआयपीने गेल्या पाच ते दहा वर्षांत 12 ते 22 टक्क्यांदरम्यान रिटर्न दिला आहे.
आरडीसाठी सहा महिने ते दहा वर्षांपर्यंत निश्चित मॅच्युरिटी कालावधी असतो. गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवेळी जमा व्याजासह मूळ रक्कम मिळते. एसआयपीमध्ये असा कोणताही निश्चित कालावधी नसतो. गुंतवणूकदार दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही इच्छित कालावधीसाठी गुंतवणूक सुरू ठेवू शकतो.
आरडी मर्यादित लवचिकता देते. तथापि काही बँक लवचिक आरडी ऑफर करू शकतात. या माध्यमातून बँका अधूनमधून चुकलेल्या हप्त्यांना कमावलेल्या व्याजात संभाव्य समायोजनासह परवानगी देतात. एसआयपी अधिक लवचिक असते. गुंतवणूकदार त्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टांच्या आधारे इक्विटी किंवा डेट यांपैकी एका प्रकारचा फंड निवडू शकतात. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार ते योगदानाची रक्कम समायोजित करू शकतात किंवा तात्पुरती योजना लांबू शकतात.
आरडीवर मिळणारं व्याज व्यक्तीच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असतं. यात कोणतीही करसवलत किंवा कपात होत नाही. एसआयपी युनिट्सच्या विक्रीतून जनरेट होणाऱ्या भांडवली नफ्याच्या प्रकारावर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अर्थात एसटीसीजी) किंवा दीर्घकालीन भांडवली नफा (एलटीसीजी) यांवर कर अवलंबून असतो.
आरडी मध्यम लिक्विडिटी देते. मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी असली तरी संबंधित व्यक्तीला प्री-सेटलमेंट दंड आकारला जातो. त्यामुळे एकूण व्याज कमी होऊ शकतं. साधारणपणे एसआयपीमध्ये आरडीच्या तुलनेत जास्त लिक्विडिटी असते. गुंतवणूदार हवं तेव्हा एसआयपीतून बाहेर पडू शकतात आणि गुंतवलेली रक्कम काढू शकतात. विशिष्ट कालावधीपूर्वी युनिट्सची पूर्तता केल्यास एक्झिट लोड चार्ज घेतला जाऊ शकतो.
जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आरडी हा चांगला पर्याय आहे. ज्यांना परताव्याच्या हमीसह सुरक्षित गुंतवणूक पर्याय हवा आहे ते आरडीची निवड करतात. एसआयपीमध्ये पारंपरिक आणि आक्रमक अशा दोन्ही गुंतवणूकदारांसाठी योग्य धोरणं आहेत. गुंतवणूकदारांना एसआयपीद्वारे ऑफर केलेल्या उच्च परताव्याचा फायदा होऊ शकतो.
निश्चित व्याजदराच्या हमीमुळे आरडी ही कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते. यात मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. एसआयपीत शेअर बाजारातली जोखीम असते. विशेषतः इक्विटी एसआयपीत जोखीम जास्त असते. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास बाजारातले चढ-उतार सुरळीत होण्यास आणि संभाव्य जोखीम कमी करण्यास मदत होऊ शकते.
यावरून नेमका काय पर्याय निवडायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुमची आर्थिक उद्दिष्टं आणि जोखीम सहनशीलता यावर एसआयपी की आरडी ही निवड अवलंबून असते. एसआयपी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून उच्च रिटर्न देऊ शकते. पण त्यात जोखीम असते. आरडी निश्चित परताव्याच्या हमीसह भांडवली संरक्षणास प्राधान्य देते. दीर्घकालीन संपत्ती जमा करण्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. कारण त्यात वाढीची क्षमता आहे. अल्प मुदतीत बचत किंवा खात्रीशीर, अपेक्षित परतावा हवा असेल तर आरडी हा चांगला पर्याय आहे.