संघर्षातून उभा राहिला प्रवास
सुशीलचे वडील लहानपणीच वारल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या आईवर आली. आईचे कष्ट पाहून सुशीलने 12 वी नंतर शिक्षण थांबवले आणि कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली. घराची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला पोलीस दलात भरती व्हायचे होते, मात्र नशिबाने साथ दिली नाही. केवळ उंची कमी पडल्याने खाकी वर्दी घालण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
advertisement
डिलिव्हरी बॉय ते यशस्वी उद्योजक
नोकरी नाही म्हणून रडत न बसता सुशीलने मिळेल ते काम केले. कधी डिलिव्हरी बॉय म्हणून तर कधी दुकानात साफसफाईचे काम करून त्याने आईला मदत केली. दरम्यान, भावंडांनी दिलेल्या सल्ल्यावरून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या 12 वीत शिकणाऱ्या भाच्याला, यशला सोबत घेऊन नाशिकमध्ये जोगेश्वरी फ्लेवर पाणीपुरी केंद्र सुरू केले.
आजच्या काळात नोकरी मिळवणं कठीण झालं आहे. जे हाल माझे झाले, ते माझ्या भाच्याचे होऊ नयेत आणि त्याला व्यवसायाचे धडे मिळावेत, यासाठी मी त्याला सोबत घेतले आहे, असे सुशील सांगतो.
महिन्याकाठी 80 हजारांची उलाढाल
सुरुवातीला छोटा वाटणारा हा व्यवसाय आज चांगलाच बहरला आहे. सुशील आणि यश या मामा-भाच्याची जोडी अत्यंत कष्टाने आणि आनंदाने हा गाडा चालवतात. चविष्ट आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पाणीपुरीमुळे ग्राहकांची त्यांना मोठी पसंती मिळत आहे. या व्यवसायातून ते आज महिन्याला 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा असताना, सुशील आणि यशने स्वतःचा मार्ग शोधून काढला आहे. कुठलेही काम लहान नसते हेच या मामा-भाच्याच्या जोडीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
तसेच तुम्हाला जर यांच्या केडीची फ्लेवर पाणीपुरी खायची असल्यास यांचा पत्ता अशोक स्तंभ सर्कल समोर, जोगेश्वरी फ्लेवर पाणीपुरी सेंटर, नाशिक या ठिकाणी आहे. इतकेच नाही तर तुमच्या लग्न समारंभासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी यांचा स्टॉल बुक करता येणारा आहे. या करता त्यांचे इन्स्टाग्राम jogesvari_panipuri_ या नावाने पेज आहे या ठिकाणी अधिक माहिती उपलब्ध होऊन जाईल.