मुंबई : टाटा ट्रस्ट्सने एकमताने वेणू श्रीनिवासन यांची आजीवन ट्रस्टी (Trustee for Life) म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. संस्थेमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांचे लक्ष मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाकडे लागले आहे.
advertisement
वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ 23 ऑक्टोबरला संपणार होता, मात्र त्यापूर्वीच या आठवड्यात त्यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा टाटा ट्रस्ट्समध्ये अंतर्गत फूट आणि मतभेदांचे वृत्त समोर येत आहेत. या फूटीत एक गट नोएल टाटा यांच्या बाजूने असल्याचे, तर दुसरा गट माजी चेअरमन रतन टाटा यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदस्यांचा असल्याचे म्हटले जाते.
एका सूत्राने सांगितले की, टीव्हीएस समूहाचे चेअरमन एमेरिटस वेणू श्रीनिवासन यांची पुनर्नियुक्ती एकमताने झाली आहे. मात्र टाटा ट्रस्ट्सने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता सगळ्यांचे लक्ष मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर आहे, ज्यांचा कार्यकाळ 28 ऑक्टोबरला संपत आहे.
यावर ट्रस्टमधील मते विभागली गेली आहेत. काही जण म्हणतात की त्यांची पुनर्नियुक्ती आपोआप होते, तर काहींचे मत आहे की त्यांना आजीवन नियुक्तीसाठी सर्व ट्रस्टींचे एकमत आवश्यक आहे.
ट्रस्ट्सची रचना आणि मालकी
टाटा ट्रस्ट्स हे एक छत्रीसंस्था असून त्याखाली सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या अनेक दानशूर संस्था आहेत. या ट्रस्ट्सकडे टाटा सन्समधील 66 टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही 156 वर्षे जुनी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. ज्यात सुमारे 400 कंपन्या आहेत, त्यापैकी 30 सूचीबद्ध (listed) कंपन्या आहेत.
एका सूत्राने सांगितले की, टाटा ट्रस्ट्सच्या पूर्वीच्या पद्धतीनुसार नवीन नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती एकमताने होणे आवश्यक असते. पुनर्नियुक्तीनंतर ती आजीवन मानली जाते, त्यामुळे सर्व ट्रस्टींची एकमताने मंजुरी आवश्यक आहे. मात्र दुसऱ्या एका सूत्राने विरोधी मत व्यक्त करत म्हटले, पुनर्नियुक्ती ही आपोआप लागू होते आणि ती सर्व ट्रस्टींसाठी एकसमानपणे लागू आहे.
17 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीतील ठराव
17 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त बैठकीतील मिनिट्सनुसार, एखाद्या ट्रस्टीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ट्रस्टीची पुनर्नियुक्ती संबंधित ट्रस्टकडून केली जाईल आणि त्याच्या कार्यकाळावर कोणतीही मर्यादा असणार नाही. ठरावानुसार जर एखादा ट्रस्टी या निर्णयाविरुद्ध मतदान करतो, तर तो आपल्या वचनबद्धतेचा भंग करतो असे समजले जाईल आणि अशा व्यक्तीला “टाटा ट्रस्ट्सवर सेवा देण्यासाठी योग्य नाही” असे मानले जाईल.
अधिक माहिती देताना सूत्राने सांगितले की, जर एखाद्या ट्रस्टीने या वचनाचा भंग केला, तर टाटा ट्रस्ट्सने आतापर्यंत घेतलेले सर्व ठराव पुन्हा उघडण्याची गरज पडेल. त्यात नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या बोर्डावर डायरेक्टर म्हणून केलेली नियुक्ती देखील समाविष्ट आहे. हा निर्णयसुद्धा 17 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीतील ठरावाचा एक भाग होता.
तसेच त्या ठरावानुसार सर्व ट्रस्टींना दीर्घकालीन आणि आजीवन आधारावर नियुक्त केले जाते. मात्र वय 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ट्रस्टीशिप पुन्हा तपासली जाईल.