विशाल यांनी भांडुप स्टेशनच्या बाहेर एक छोटी जागा घेऊन सुरुवातीला फ्रँकी विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते, ग्राहक नव्हते, विक्री नव्हती. पण हात टेकण्याचा प्रश्नच नव्हता. सातत्य ठेवून ते रोज दुकान उघडत राहिले आणि काही दिवसांतच त्यांच्या चवीने ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली. हळूहळू टेस्टी राइडची ओळख वाढू लागली आणि व्यवसायाची गाडी रुळावर आली.
advertisement
आज विशाल फ्रँकीसोबतच बर्गर, सँडविच, मोमोज आणि इतर फास्ट फूड पदार्थही विकतात. ग्राहकांचा प्रतिसाद इतका उत्तम आहे की ते महिन्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न कमावतात. त्यांच्या व्यवसायाला आता सहा वर्षे पूर्ण झाली असून लॉकडाउनच्या कठीण काळातही त्यांनी हार मानली नाही. वर्षभर दुकान बंद राहिल्यानंतर सुरुवातीला त्यांनी स्वतः लोकांपर्यंत डिलिव्हरी करून व्यवसाय पुन्हा उभा केला.
विशेष म्हणजे आज विशाल यांनी दोन जणांना रोजगारदेखील दिला आहे. याचा त्यांना विशेष अभिमान आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे अनेकजण म्हणतात पण ते चुकीचे आहे. मेहनत, कौशल्य आणि सातत्य असेल तर कोणताही मराठी तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो असे त्यांचे मत आहे. ग्राहकांना उत्तम गुणवत्ता देणे हाच त्यांच्या यशाचा मंत्र आहे. भांडुपच्या या तरुणाने संघर्षातून घडवलेले यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.