१) उत्पन्नकरात दिलासा मिळणार?
मागील अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी देण्यात आली होती. तसेच पगारदारांसाठी मानक वजावट वाढवून कर स्लॅब अधिक सोपे करण्यात आले. मात्र अनेक करदाते अजूनही या मर्यादेबाहेर आहेत. त्यामुळे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा १४ लाखांपर्यंत वाढवावी, अशी जोरदार मागणी आहे.
२) जुन्या कर व्यवस्थेत बदल?
advertisement
नवीन कर व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जात असले तरी मोठा वर्ग अजूनही जुनी कर प्रणाली वापरतो. सध्या मूलभूत सूट मर्यादा २.५ लाख रुपये असून, कलम ८७अ अंतर्गत ५ लाखांपर्यंत दिलासा मिळतो. ही मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
३) टीडीएस नियमांमध्ये सुधारणा?
मागील बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र आता भाडे उत्पन्न आणि व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा आणखी वाढवावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त सूट द्यावी, अशी मागणी होत आहे.
४) एनपीएसवर करसवलत?
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत (NPS) निवृत्तीवेळी ८० टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यावर करमाफी मिळावी आणि नवीन कर प्रणालीत एनपीएसवरील सूट समाविष्ट करावी, अशी अपेक्षा आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
५) जीएसटीमध्ये मोठे बदल?
काही महिन्यांपूर्वी जीएसटी दरात बदल करून अनेक वस्तू स्वस्त करण्यात आल्या होत्या. आता शिक्षण, एमएसएमई आणि रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक सवलती, तसेच पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरत आहे.
६) विमा क्षेत्रासाठी प्रोत्साहन
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मान्यता आणि जीएसटी सवलतीनंतर आता ग्रामीण भागात आरोग्य व जीवन विमा पोहोचवण्यासाठी नवीन धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.
७) सोने-चांदी महागाईवर उपाय?
सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे दागिन्यांची विक्री घटली आहे. आयात शुल्क आणि जीएसटी दरात कपात, तसेच कर भरण्यात सवलत देण्याची मागणी ज्वेलर्स करत आहेत.
८) शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?
शेतकऱ्यांना पीएम-किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणारी ६,००० रुपयांची मदत १२,००० रुपयांपर्यंत वाढवावी, तसेच पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करावी, अशी अपेक्षा आहे.
९) शेअर बाजाराला दिलासा?
जागतिक तणावामुळे बाजारात अस्थिरता आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी LTCG, STCG आणि STT मध्ये सवलत, तसेच दुहेरी करप्रणाली हटवण्याची मागणी होत आहे.
१०) ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती
कोविडपूर्वी मिळणारी रेल्वे तिकिटांवरील सवलत पुन्हा सुरू करावी, तसेच आरोग्य आणि कर सवलती वाढवाव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघटनांकडून होत आहे.
