सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टीव्ही, एसी त्याचबरोबर मोटरसायकल दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील. यामुळे खरेदी विक्री व्यवहार वाढवून उत्पादन वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी भावना जालन्यातील व्यापारी रामेश्वर मुंदडा यांनी व्यक्त केली. तसेच या प्रक्रियेला आणखी सुलभ करता आले तर ते करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
advertisement
चार टॅक्स स्लॅब असल्यामुळे व्यापाऱ्यांना अनेकदा किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागायचा. बहुतेक वस्तूंना समाविष्ट केल्यामुळे प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर हे कमी होणार असल्याने ग्राहकांबरोबर व्यापाऱ्यांनाही याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे व्यापारी म्हणून आम्ही सर्वजण मनापासून स्वागत करतो. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी भावना जालन्यातील उद्योजक कपिल चावला यांनी व्यक्त केली.
वाहन क्षेत्रात दिलासा
छोट्या कार, स्कूटर आणि 350 सीसीपर्यंतच्या मोटरसायकलवर जीएसटी 28 टक्के वरून 18 टक्के करण्यात आला आहे. मोठ्या कारवर मात्र 40 टक्के जीएसटी कायम राहील. इलेक्ट्रिक गाड्यांवर आधीसारखाच 5 टक्के कर लागेल.
दैनंदिन वापराच्या वस्तूंवर मोठा फायदा
साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम, आइसक्रीम, बटर, घी, चीज, डेअरी प्रॉडक्ट्स, बिस्किट, चॉकलेट, नमकीन, पास्ता, ड्राय फ्रूट्स, माल्ट, कॉर्नफ्लेक्स यांसारख्या वस्तूंवरील कर 18 टक्के वरून 5 टक्के करण्यात आला आहे. रोट्या, पराठे आणि UHT दूध आता पूर्णपणे करमुक्त झाले आहेत. यामुळे घरगुती खर्चात बचत होणार आहे.
तंबाखू उत्पादने महागच
पान मसाला, गुटखा, सिगारेट आणि तंबाखू उत्पादने यांच्यावर पूर्वीप्रमाणेच जास्त जीएसटी आणि कंपनसेशन सेस आकारला जाणार आहे. किमती ठरवताना आता ट्रांझॅक्शन व्हॅल्यूऐवजी रिटेल सेल प्राइस (RSP) हा आधार घेतला जाईल, ज्यामुळे नियम अधिक कडकपणे लागू होतील.