पुणे : पुणे शहर हे झपाट्याने वाढत असून पुण्याला विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. कामानिमित्ताने किंवा शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळेच पुण्यात घर घेणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. पुणे शहरातील कुठल्या भागात घरांना जास्त मागणी आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागात त्याच्या किमती काय आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
इस्टेट एजंट मुकेश दुडेजा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पुण्यातील मध्यवर्ती समजला जाणारा भाग म्हणजे डेक्कन परिसर आणि शहरातील मध्यवर्ती भागात घर घ्यावे असे अनेकांचे स्वप्न असते. या भागातील घराच्या किमती या अडीच कोटींच्या पुढे आहेत. शहराला जोडणारा महत्वाचा भाग त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा, शाळा, कॉलेज आणि व्यावसायिक दृष्ट्यादेखील महत्वाचा असा हा भाग आहे.
पुण्याचे जे रिअल इस्टेट मार्केट आहे, ते सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात घर घेण्याची अनेकांची इच्छा असते. कारण आता होणारी डेव्हलपमेंट ही पाहिली तर मेट्रो, इतर सोयीसुविधा, शिक्षण, आयटी कंपन्यांमुळे अधिक लोक हे पुण्यात घर घेत आहेत. पुण्यातील जो सर्वात जुना भाग आहे तो म्हणजे डेक्कन परिसर, शिवाजीनगर भाग. याठिकाणी 2 BHK फ्लॅटची किंमत ही 1.5 कोटी आहे. तर 3 BHK ची किंमत ही 2.5 कोटींच्या पुढे आहे.
इथे एक चौरस फूटचे दर हे 12 ते 20 हजारांपर्यंत जातात. हा परिसर डेव्हलप असल्यामुळे लोकांचा कल हा वाढतो आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांची मागणीदेखील वाढत आहे, अशी माहिती इस्टेट एजंट मुकेश दुडेजा यांनी दिली. त्यामुळे तुम्हालाही जर या भागात घर घ्यायचा विचार करत असाल, तर हे दर नक्कीच माहिती करून घ्या.