मुंबई: भारतात सोनं ही केवळ गुंतवणुकीची गोष्ट नाही, तर भावना आणि परंपरेचा एक भाग आहे. प्रत्येक घरात कधीतरी सोनं विकत घेतलं जातं. कोणाच्या लग्नासाठी, सुरक्षिततेसाठी किंवा केवळ शुभत्वासाठी. मात्र काळ बदलत चालला आहे आणि या परंपरेचं स्वरूपही बदलत आहे. आता सोनं दागिन्यांच्या दुकानातून नव्हे तर मोबाईल अॅपवरून विकत घेतलं जातं. Paytm, PhonePe आणि Groww सारख्या प्लॅटफॉर्मवर आता फक्त 10 रुपयांतही 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करता येते. सणासुदीच्या काळात जेव्हा सोन्याचा भाव 13,000 रुपये प्रति ग्रॅमच्या पुढे गेला आहे, तेव्हा लोकांपुढे प्रश्न उभा राहतो? आता खरं सोनं घेणं योग्य की डिजिटल गोल्ड?
advertisement
डिजिटल गोल्ड म्हणजे काय?
डिजिटल गोल्ड म्हणजे असं सोनं जे तुम्ही ऑनलाइन विकत घेता, पण ते प्रत्यक्षात फिजिकल बुलियन स्वरूपात सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवलेलं असतं. MMTC-PAMP किंवा SafeGold सारख्या कंपन्या हे सोनं सांभाळतात. म्हणजेच तुमचं सोनं प्रत्यक्षात अस्तित्वात असतं, पण ते तुमच्या घरात नसून सुरक्षित लॉकरमध्ये ठेवलेलं असतं. तुम्ही हवं तेव्हा ते थोडं थोडं करून विकत घेऊ शकता किंवा लगेच विकूही शकता सगळं काही अॅपवर काही सेकंदांत होतं.
आजही खरं सोनं का आवडतं?
दागिने, नाणी किंवा बिस्किटं या स्वरूपात सोनं खरेदी करणे ही भारतीयांची पारंपरिक पहिली पसंती आहे. कारण सोपं आहे- हे सोनं हातात असतं, दिसतं आणि गरज पडली तर कामी येतं. मात्र यालाही काही त्रास आहेत ते म्हणजे मेकिंग चार्ज, शुद्धतेची खात्री आणि चोरीचा धोका. शिवाय विकताना डिझाईन आणि वजनामुळे किंमतीत कपात होते आणि त्यामुळे नफा कमी मिळतो.
कोणतं जास्त फायदेशीर
डिजिटल गोल्डचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सुविधा आणि लिक्विडिटी. तुम्ही हवं तेव्हा ते विकू शकता आणि काही मिनिटांत पैसे थेट तुमच्या बँकेत येतात. पण खरं सोनं विकताना वेळ लागतो आणि किंमतीवरही परिणाम होतो. तरीही डिजिटल गोल्डलाही मर्यादा आहेत. बहुतेक प्लॅटफॉर्मवर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. त्याशिवाय हे अद्याप RBI किंवा SEBI च्या नियमनाखाली नाही. ज्यामुळे मोठे गुंतवणूकदार थोडे सावध राहतात.
कर नियम दोघांसाठी सारखेच
डिजिटल असो वा फिजिकल सोनं यासाठी कराचे नियम एकसारखेच आहेत. तीन वर्षांच्या आत विकल्यास झालेला नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जातो आणि त्यावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागतो. तीन वर्षांनंतर विकल्यास 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, ज्यामध्ये इंडेक्सेशनचा फायदा मिळतो. जर तुम्हाला टॅक्स-फ्री पर्याय हवा असेल तर Sovereign Gold Bonds (SGBs) एक उत्कृष्ट निवड आहे, कारण त्यांची मॅच्युरिटी झाल्यावर कर लागू होत नाही.
तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?
जर तुम्हाला छोट्या रकमेत गुंतवणूक करून सोनं साठवायचं असेल आणि कटकट नको असतील, तर डिजिटल गोल्ड तुमच्यासाठी उत्तम आहे. पण जर तुम्ही सोनं दागिन्यांच्या रूपात परिधान करण्याचा किंवा घरात ठेवण्याचा विचार करत असाल, तर खऱ्या सोन्याला तोड नाही, तेच तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
