जळगाव - अनेकदा आयुष्यात कठीण प्रसंग येतात, व्यक्ती निराश होतो. मात्र, काही जण असे असतात जे कठीण प्रसंगातही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आपल्या ध्येयाच्या दिशेने जिद्दीने प्रवास करतात आणि सर्वांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवतात. आज अशाच महिलेच्या जिद्दीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
सपना राजपूत असे या महिलेचे नाव आहे. एक क्विंटल वजनाचे ट्रकचे टायर 3 वेळा सपना यांच्या पायावर कोसळले. जखमी होऊन त्यांना घरात बसावे लागले. मात्र, तरीसुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही. नवे तंत्र चिकाटीने समजून घेतले. आता त्या स्वत:च्या बळावर कुणाचीही मदत न घेता रोज 20 ट्रकचे पंक्चर काढण्याचे जोखमीचे काम पार पडत आहेत.
advertisement
जळगाव येथील सपना राजपूत या महिलेच्या जिद्द आणि धाडसाची ही कहाणी आहे. लोकल18 शी बोलताना सपना यांनी त्यांचा प्रवास उलगडला. यावेळी त्या म्हणाल्या की, वयाच्या नवव्या वर्षी आई वारल्याने लहान बहीण व भावाचा त्यांना सांभाळ करावा लागला. शिक्षणाची आवड असताना देखील शाळेचे तोंडही बघितले नाही. लग्न झाल्यानंतर दोन पोरांसह स्वतःच्या आईची जबाबदारी असताना पतीचे निधन झाले.
तर पतीच्या निधनानंतर खचून न जाता पोटच्या दोन पोरांचा व सासूचा सांभाळ करण्यासाठी घरात पैसा यावा म्हणून सपनाने नवऱ्याचे एमआयडीसीतील भारत गॅस प्लांट जवळ असलेले पंक्चर काढण्याचे दुकान सांभाळण्याचा निर्णय घेतला. आज महिन्याला या व्यवसायातून 30 ते 35 हजारांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन अन् हेलिकॉप्टर फटाके घेतले का? एकदा पाहाच हा VIDEO
सुरुवातीला त्यांनी त्यांच्या या दुकानावर कामगार ठेवले होते. परंतु ते टिकत नसल्याने सपना स्वतः या कामात उतरल्या. एक महिला पंचर काढण्याचे काम करीत असल्याने सर्वानीच टिंगल उडविली. तुझ्याकडून नाही होणार असे बोलून समाजातील लोकांनी, नातेवाईकांनी देखील माझी साथ सोडली. राजपूत समाजात महिला कामावर जात नाही, असे त्यांनी सांगितले आणि मी काम करते तर हे कोणाला आवडत नाही. त्यामुळे देखील समाजात माझ्याशी आजवर कोणी बोलत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, या सर्व परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपल्या स्वतःच्या वजनाच्या दुप्पट असलेले, क्विंटलभर वजनाच्या ट्रकच्या टायरचे पंक्चर काढण्याचे तंत्र अवगत केले. त्यांची मुलगी किंजली ही सध्या तिसरीत शिकत आहे. त्यांच्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या जिद्दीने आपला प्रवास करत आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.