पोलिसांनी लाचेसाठी नागरिकाला वेठीस धरलं
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हा गोलदेऊळ परिसरात सिगारेटची विक्री करतो. 16 जानेवारी रोजी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांनी त्याला गाठले. परवाना नसताना विदेशी सिगारेटची विक्री करत असल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली.
खाकी वर्दीतले 'वसुली भाई'
advertisement
गुन्ह्यात आरोपी करायचे नसेल तर 40 हजार रुपये 'गुडलक' आणि दरमहा 10 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी या दोन्ही पोलिसांनी केली. मात्र एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोड करण्यात आली. अखेर 20 हजार रुपये गुडलक आणि दरमहा 10 हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले.
लाच देण्यास नकार देत विक्रेत्याने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.
दोन पोलीस अखेर एसीबीच्या जाळ्यात
पहिल्या हप्त्यापोटी 15 हजार रुपये एजंट राजसिंग शिवकुमार सिंग याच्याकडे देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पैसे घेताना एसीबीच्या पथकाने राजसिंगला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लगेचच कॉन्स्टेबल राजेंद्र व्यवहारे याला अटक करण्यात आली. मात्र दुसरा कॉन्स्टेबल राजेंद्र आंबीलवाड फरार झाला आहे. या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एसीबी अधिकाऱ्यांनी दिली आहे
