जाणून घ्या कुठून कुठपर्यंत जोडणी
बीएमसीने उभारलेला हा स्कायवॉक वांद्रे स्टेशन रोड संपूर्णपणे ओलांडून थेट महामार्गाला जोडतो आणि पुढे कलानगर जंक्शन येथे उतरतो. त्यामुळे वांद्रे कोर्ट, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), म्हाडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना गर्दीच्या रस्त्यावरून, वाहनांच्या कोंडीतून जावे लागत होते. मात्र आता स्कायवॉकमुळे ही अडचण दूर होणार आहे.
advertisement
स्कायवॉक सुरू होण्याची तारीख जाहीर
वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक हा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. याचे वैशिष्टे म्हणजे सहा मीटर रुंद असलेल्या या नव्या स्कायवॉकवर दोन ठिकाणी एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. तसेच तीन ठिकाणी अतिरिक्त जिन्यांची सोय करण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होईल आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.
वांद्रे पूर्व येथील हा स्कायवॉक शहरातील जुन्या स्कायवॉकपैकी एक मानला जातो. 2008 मध्ये एमएमआरडीएने उभारलेला जुना पूल दुरवस्थेमुळे 2019 मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो पाडून नव्याने बीएमसीने स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा स्कायवॉक 450 मीटर लांबीचा असणार होता मात्र स्थानिकांच्या मागणीनंतर तो 680 मीटरपर्यंत वाढवण्यात आला. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
