मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व अशी परिस्थितीत पाहण्यास मिळाली. पण, या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या यादीत मराठीचा ठसा पाहण्यास मिळाला पण त्यासोबत मुस्लिम उमेदवारही पाहण्यास मिळाले. तर सत्ताधारी भाजपच्या यादीत चक्क अमराठी उमेदवारांचा भरणा जास्त होता.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 75 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि अर्जही दाखल केले. तर दुसरीकडे भाजपनंही 66 उमेदवार मैदानात उतरवले. दोन्ही पक्षांच्या यादीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. महिला मतदार आणि व्होट बँक जपण्यावर चांगलाच भर देण्यात आला आहे.
advertisement
व्होट बँक टार्गेट
मुंबईचा महापौर मराठीच असणार हे ठाकरे आणि महायुतीनं ठासून सांगितलंय. त्यासाठी त्यांची जोरदार तयारीही सुरू झाली. परिणामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरायला सुरूवात झाली. दुसरीकडे मराठी महापौर करण्यासाठी राजकीय पक्षांना व्होट बँकेवर भर दिल्याचं स्पष्ट होतंय. कारण, व्होट बँक जपली तरच विजयाचा मार्ग सोपा होणार आहे, हे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं.
भाजपकडून २० अमराठी उमेदवार
भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या यादीत अमराठी उमेदवारांचा दबदबा पाहायला मिळतोय. भाजपनं 66 पैकी 20 अमराठी उमेदवार दिलेत. जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंह तिवाना, संदीप पटेल, सुधा सिंह, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा आणि आकाश पुरोहित या अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
तर भाजप मराठीचा सन्मान करत समतोल साधत असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. भाजपनं अमराठी मतदारांची व्होट बँक जपण्यासाठी अमराठी उमेदवारांवर भर दिला. तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारी यादीत वेगळं चित्र होतं.
ठाकरेंचा फँटास्टिक 4 M फॉर्म्युला
4 M वर उद्धव ठाकरेंची भिस्त असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई, मराठी, महिला आणि मुस्लीम यावर त्यांनी भर दिलाय. 40 महिलांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली. मुंबईच्या रणांगणात 6 मुस्लीम उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यातही 4 महिला उमेदवार आहेत. उमेदवारी यादीत असलेला मराठीचा ठसा आणि बहुसंख्येनं असलेल्या महिला उमेदवार यशस्वी ठरतील, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतोय.
ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनं त्यांची व्होट बँक जपण्यासाठी शिकस्त केल्याचं पाहायला मिळतंय. आता अमराठी मतदार भाजपची कितपत पाठराखण करतात? तर मराठी आणि मुस्लीम मतदार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे किती उमेदवार निवडून देतात? हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजून कौल दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही रणनीती तर अवलंबली नाही ना? अशाही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
