तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर (विनोद घोसाळकर यांचा मुलगा) यांचा फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळवण्यासाठी तेजस्वी घोसाळकर या प्रयत्न करत आहेत. तसेच घोसाळकर कुटुंबियांवर झालेला अन्याय पाहून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून तेजस्वी घोसाळकरला पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता होती. पण ऐनवेळी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंना तेजस्वी घोसाळकर यांच्यासमोर एक तगडा उमेदवार उभं करण्याचं आव्हान होतं. या आव्हानाला स्वीकारत उद्धव ठाकरे धनश्री कोलगेला उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे या दोघी मैत्रिणी आहेत.त्यामुळे दोन्ही मैत्रिणी निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.
advertisement
कोण आहे ठाकरेंची उमेदवार?
धनश्री कोलगे या युवासेनेच्या कार्यकारी सदस्या आहेत. वॉर्डमध्ये शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्या काम करतात. त्यांच्या याच कामाची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांना तेजस्वी घोसाळकरांविरूद्ध मैदानात उतरवले आहे. माझ्या समोर जरी घोसाळकर कुटुंबियांची सुन असली तरी विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पुर्ण पाठिंबा आहे, त्यांनी आमच्यावर कुठेही अविश्वास दाखवला नाही,असे धनश्री कोलगे म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे सुनेने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विनोद घोसाळकरांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत सासरे विनोद घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार तर त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत.
दरम्यान ही निवडणुक गद्दार विरूद्ध निष्ठावंत,टीव्हीवरील चेहरा विरूद्ध रस्त्यावरील चेहरा,बाहेरचा उमेदवार विरूद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे धनश्री कोलगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
