दादर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने स्वत:वरच जीवघेणा हल्ला केला. त्याने स्वत:ला धारदार चाकुने भोसकलं. यावेळी रेल्वेस्थानक परिसरात सेवेवर असणाऱ्या होमगार्डने संबंधित प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. या प्रवाशाला रोखल्यानंतर त्याने पुन्हा एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन होमगार्ड संबंधित प्रवाशाला पकडून समजावून सांगताना दिसत आहेत. याच दरम्यान दादर स्थानकावर एक एक्स्प्रेस ट्रेन येताना दिसते. हे पाहून संबंधित प्रवाशी ट्रेनच्या दिशेनं धाव घेतो. मात्र होमगार्ड राहुल सरोज यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. यावेळी प्रवाशाने हिसके देऊन स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सरोज यांनी त्याला घट्ट पकडून त्याचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार दादरच्या फलाट क्रमांक १२ वर घडला आहे.
संबंधित प्रवाशाने अशाप्रकारे जीवन संपवण्याचा प्रयत्न का केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पण मुंबईतील काळाचौकी येथील चाकू हल्ल्याचं प्रकरण ताजं असताना अत्यंत गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने अशाप्रकारे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
