तक्रारदार व्यक्ती ही मुंबईतील एक प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर आहे. संबंधित व्यक्तीला आणि त्यांच्या पत्नीला डिजिटल अटक करून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने वेगवेगळ्या राज्यातील १८ बँक खात्यांमध्ये ५८ कोटी रुपये ट्रान्सफर केले.
पोलिसांनी या प्रकरणात ३ आरोपींना अटक केली आहे.
तिन्ही आरोपी तक्रारदाराला व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचं सांगत होते. ते तक्रारदाराला डिजिटल पद्धतीने अटक करायचे आणि त्याची सर्व मालमत्ता आणि पैसे जप्त करण्याची धमकी द्यायचे. भीतीपोटी तक्रारदाराने आरोपींना तब्बल ५८ कोटी रुपये ट्रान्सफर केले. पोलिसांच्या मते, या टोळीची व्याप्ती खूप मोठी असून याचं जाळं संपूर्ण भारतासह परदेशात पसरलेलं असावं, अशी शक्यता वर्तवली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
एका ७२ वर्षीय व्यावसायिकाला एका सायबर घोटाळ्यात ५८ कोटी रुपये गमवावे लागले. ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला 'डिजिटल अटक' केली आणि मनी लाँड्रिंगचा खटला चालवण्याची धमकी दिली. तसेच बनावट कागदपत्रे बनवून व्हिडिओ कॉलवर सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून ही लूट करण्यात आली. यासाठी आरोपींनी बनावट ओळखपत्रांचा वापर केला. पीडिताला मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याचं पटवून देत ही फसवणूक करण्यात आली. आरोपींनी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांचा तक्रारदाराशी संपर्क केला होता. तेव्हापासून ही फसवणूक सुरू होती. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींना त्यांच्या प्रत्येक वैयक्तिक खात्यात २५ लाख रुपये मिळाले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.