एका 'क्लिक'वर 11 कोटी गायब
चर्चगेट परिसरात राहणाऱ्या या व्यावसायिकाची लॉजिस्टिक कंपनी आहे. निवांत वेळेत शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे शिकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली असता विविध वेबसाइट्स आणि हेल्पलाइन दिसल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजारातील ऑनलाइन मार्गदर्शनाबाबत संदेश आला.
व्यावसायिकाने होकार दिल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये अॅडमिन आणि इतर सदस्य शेअर बाजारातील टिप्स देत होते. बाजारातील अपडेट्स अचूक वाटत असल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर अॅडमिनने एक लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपमध्ये वॉलेट अकाऊंट तयार करून युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला.
advertisement
अखेर सायबर पोलिसांत तक्रार दाखल
ग्रुपमधून मिळणाऱ्या सल्ल्यानुसार व्यावसायिकाने अॅपद्वारे गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला नफा दिसत असल्याने त्यांनी हळूहळू तब्बल 11 कोटी रुपये गुंतवले. मात्र काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर पैसे मिळाले नाहीत. संपर्क साधल्यावर अॅडमिनने दंड म्हणून आणखी आठ कोटी रुपये भरण्याची मागणी केली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
