24 डिसेंबरच्या रात्री काय घडलं?
अमीनाबी सिद्दीकी या रायझिंग सिटीमध्ये कुटुंबासह राहत होत्या. 24 डिसेंबर रोजी रात्री त्या नेहमीप्रमाणे घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाल्या. मात्र बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. 25 डिसेंबर रोजी सकाळी रायझिंग सिटी केडी-9 समोरील झुडपात अमीनाबी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव होते. त्यामुळे हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे समोर आले.
advertisement
या घटनेनंतर परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक तपास तसेच साक्षीदारांची चौकशी केली.
हत्येचे कारण आले समोर!
तपासादरम्यान मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरे आलम अन्सारी (वय40) याच्यावर संशय आला यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अमीनाबी यांनी आरोपीच्या पत्नीकडून 3 लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत न मिळाल्याने आरोपीच्या मनात राग होता. याच रागातून त्याने रात्री पाळत ठेवून अमीनाबी यांचा खून केल्याचे उघड झाले. सध्या या आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
