मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अखेर कडक पाऊल उचलत इमारतीचा विकासक, ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी ८ ऑक्टोबरला सकाळी घडली होती. मृत तरुणी आपल्या कामावर जात असताना, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून अचानक एक वीट तिच्या डोक्यात पडली. वीट लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांची येथे अंमलबजावणी केली गेली नव्हती, अशी माहिती समोर आली. शिवाय बांधकामाच्या ठिकाणी खाली जाळी किंवा अन्य सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झालं. विकासक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीचा जीव घेतला, असे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मेघवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.