पोलिसांनी असा लावला छडा
हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी विशेष पथके तैनात केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासात असे दिसून आले की, आरोपी नियमितपणे मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड स्थानकावर सापळा रचला आणि आज सकाळी आरोपीला ताब्यात घेतले.
advertisement
नेमकी घटना आणि हत्येचे कारण
मृत आलोक कुमार सिंग (३१) हे कांदिवलीचे रहिवासी असून विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ते चर्चगेट-बोरिवली लोकलने प्रवास करत होते. मालाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी आली असता, डब्यातून उतरताना त्यांचा एका तरुणाशी धक्का लागल्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या तरुणाने आपल्या जवळील तीक्ष्ण हत्याराने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंग यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र पळून जाताना कुठेतरी फेकून दिले आहे. पोलीस आता ते शस्त्र जप्त करण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस त्याची कोठडी मागणार आहेत. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रागाच्या भरात घडल्याचे दिसत असले तरी, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
