मुंबई: मुंबईची लाइफलाईन असलेली लोकलमध्ये तिन्ही मार्गावर दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे गर्दीमध्ये वाद आणि धक्काबुक्कीची घटना नवीन नाही. पण, याच गर्दीत होणाऱ्या वादातून एका प्रवाशाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर २४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म एकवर एका प्रवाशाची धारधार शस्त्राने पोटात खुपसून हत्या करण्यात आली आहे. अलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे. लोकलमध्ये किरकोळ भांडणतून अलोक सिंग याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकलमध्ये अलोक सिंग यांचं एका प्रवाशासोबत कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. लोकलमधून उतरण्याच्या कारणावरून हे भांडण झालं होतं. मालाड स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल थांबल्यानंतर दुसऱ्या प्रवाशाने सोबत असलेल्या धारदार शस्त्राने अलोक यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे मालाड स्थानकावर एकच खळबळ उडाली.
अलोक सिंग हे रक्ताच्या थारोळ्यात प्लॅटफॉर्मवर कोसळले. हल्ला करणारा प्रवासी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अलोक सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
रेल्वे पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. लोकल स्टेशनवर झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
