लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जंतूमुळे होणारा आजार आहे. हा जंतू प्रामुख्याने पावसाच्या पाण्यात मिसळलेल्या उंदरांच्या लघवीतून पसरतो. साचलेल्या वा वाहत्या पाण्यात हे सूक्ष्म जंतू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला जखम, खरचटलेले किंवा सूक्ष्म चिरा असतील, तर या जंतूंना शरीरात प्रवेश करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा व्यक्तींना लेप्टोची बाधा होण्याचा धोका वाढतो. वेळेवर उपचार न घेतल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो.
advertisement
महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांनुसार, पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया किंवा लेप्टोस्पायरोसिस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताप आल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालून आलेल्या व्यक्तींनी तर त्वरित दक्षता घ्यावी.
कोणती काळजी घ्यावी?
पावसाळ्यात पायाला जखम किंवा खरचटलेली जागा असल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे.
बाहेर पडणे आवश्यक असल्यास रबराचे गमबूट वापरावेत.
साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय आणि हात साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.
ओले कपडे त्वरित बदलावेत आणि कोरडे, स्वच्छ कपडे घालावेत.
पावसाळ्यात कोणताही ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांत लालसरपणा किंवा उलट्या यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डासांपासूनही सावधगिरी आवश्यक
लेप्टोस्पायरोसिससोबतच डेंग्यू आणि मलेरियाचा धोका देखील पावसाळ्यात वाढतो. त्यामुळे घराभोवती पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. 'शून्य डास मोहीम' राबवून डासांची उत्पत्ती रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पावसाळी आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, तसेच त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हेच सर्वात मोठे शस्त्र असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.