नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई मेट्रो 1 मध्यरात्रीपर्यंत धावणार
या घेतलेल्या निर्णयानुसार मेट्रो 1 मार्गिकेवर 28 अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या असून एकूण फेऱ्यांची संख्या 504 इतकी असेल. नियमितपणे या मार्गावर दररोज 476 फेऱ्या घेतल्या जातात पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी गर्दी लक्षात घेता मध्यरात्री 2.45 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.
जाणून घ्या मेट्रोचे वेळापत्रक
advertisement
सामान्य दिवसांप्रमाणे पहिली मेट्रो सकाळी 5.30 वाजता घाटकोपर आणि वर्सोवा येथून सुटणार आहे. मात्र सेवा वाढविल्यामुळे वर्सोव्यातून शेवटची मेट्रो रात्री 2.14 वाजताbतर घाटकोपरहून शेवटची गाडी रात्री 2.40 वाजता सुटणार आहे. गर्दीच्या वेळेत दर 3 मिनिटे 20 सेकंदांनी मेट्रो धावेल तर गर्दी कमी असताना 5 मिनिटे 55 सेकंदांचे अंतर असेल. मध्यरात्री 12 नंतर मात्र मेट्रो गाड्या दर 12 मिनिटांनी उपलब्ध असतील.
नववर्ष साजरे करण्यासाठी समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे तसेच शहरातील विविध भागांत जाणाऱ्या मुंबईकरांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय 31 डिसेंबर रोजी लोकल रेल्वे, बेस्ट बसच्या विशेष फेऱ्याही धावणार असून आरे-कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिका चोवीस तास सुरू राहणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या जल्लोषासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे
