पुणे : मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 15-15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यात येत आहेत. या अंतर्गत पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा टनलजवळ थांबवली जात असून, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने दत्तवाडी–खंडाळा येथून विरुद्ध दिशेने सोडली जात आहेत.
advertisement
या उपाययोजनेमुळे काही प्रमाणात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळत असला, तरी मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा टनलजवळ थांबवल्याने एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागत आहे.
कुठे कुठे वाहतूक कोंडी?
महामार्गावरील खंडाळा टनल, बोरघाट चौकी, दत्तवाडी, अंडा पॉईंट आणि खोपोली एक्झिट या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस सतत कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाहनचालकांनी संयम राखावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गर्दीमुळे कोंडी कायम
सलग आलेल्या सुट्ट्यांचा परिणाम लोणावळा आणि खंडाळा परिसरात तीव्रपणे जाणवत आहे. वीकेंडसाठी आलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला लागल्याने लोणावळा शहरात तसेच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र असून वाहतूक पूर्णपणे संथ गतीने सुरू आहे. या कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणारे स्थानिक नागरिक अडचणीत सापडली आहेत. वाहतूक पोलीस परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी गर्दीमुळे कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.
