नेमकी घटना काय?
भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली नावाच्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून झाल्याचे समजतं. हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल २२ वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
advertisement
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमांमुळे आणि अतिरक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. आरोपींची ओळख पटवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मयत शंकरने अजित पवार गटातून उभ्या राहिलेल्या सज्जू मलिक यांचा प्रचार केला होता. तसेच दिवसांपूर्वी मिलिंद नगरमध्ये त्याचा काही जणांशी वादही झाला होता. याच वादातून त्याची हत्या करण्यात आली असावी, अशी माहिती आता मिळतं असून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
