प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय?
आपल्या भारतमातेला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 साली इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी देशात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था आणि प्रशासकीय रचना अस्तित्वात होती. ही इंग्रजी राज्यव्यवस्था मोडीत काढून भारताची स्वतंत्र राज्यव्यवस्था उभारण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
advertisement
देशासाठी संविधान तयार करण्याची जबाबदारी या संविधान सभेकडे होती. संविधान सभेने तयार केलेले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारण्यात आले. त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती, मात्र संपूर्ण संविधान अंमलात आले नव्हते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आले. याच दिवसापासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला.
भारतीय संविधान तयार करण्याची सुरुवात 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन झाली आणि त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. या कामासाठी त्यांना जवळपास 3 वर्ष लागले. या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी 11 सत्र आयोजित करण्यात आले आणि 114 दिवस चर्चा झाली. शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत हा मसुदा स्वीकारला गेला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान संपूर्णपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले, त्यामुळे हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो.
यावर्षी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या दिवसामुळे भारतातील नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. विविध जाती, धर्म आणि भाषा असलेले लोक एकत्र येत गुण्यागोविंदाने राहू लागले. प्रजासत्ताक दिन हा देशातील लोकशाहीच्या विजयाचा दिवस मानला जातो. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय जनतेला देशाचे राज्यकारभार स्वतः चालविण्याचा अधिकार मिळाला.





