पोलिस दलातील नोकरी सोडली, शेतात फक्त १०० रोपं लावली, शेतकरी आता होणार लखपती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : अलीकडच्या काळात शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता अनेक शेतकरी आता नव्या आणि उत्पन्नवाढीच्या संधी देणाऱ्या पिकांकडे वळताना दिसत आहेत.
मुंबई : अलीकडच्या काळात शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता अनेक शेतकरी आता नव्या आणि उत्पन्नवाढीच्या संधी देणाऱ्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, कमी खर्च आणि दीर्घकालीन नफ्याचा विचार करत काही शेतकरी वेगळे प्रयोग करत असून चंदन शेती हा त्यातील एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील अविनाश कुमार यादव यांची पांढऱ्या चंदनाची शेती ही अशाच यशस्वी प्रयोगांची प्रेरणादायी कथा ठरत आहे.
पांढऱ्या चंदनाची शेती
अविनाश कुमार यादव यांनी पारंपरिक मार्ग सोडून धाडसी निर्णय घेत पांढऱ्या चंदनाची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी पोलिस दलातील सुरक्षित नोकरीचा राजीनामा दिला. अविनाश यादव हे १९९८ साली पोलीस सेवेत रुजू झाले होते. मात्र शेतीविषयीची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यामुळे त्यांनी २००५ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पारंपरिक शेती करत असतानाच २०१६ मध्ये त्यांनी पांढऱ्या चंदनाची लागवड करण्याचा धाडसी प्रयोग सुरू केला.
advertisement
२०१६ साली केली सुरुवात
२०१६ साली अविनाश यादव यांनी कर्नाटकातून पांढऱ्या चंदनाची १०० रोपे मागवली. त्या वेळी एका रोपाची किंमत सुमारे २०० रुपये होती. परिसरात पांढऱ्या चंदनाची लागवड करणारे ते पहिलेच शेतकरी ठरले. सुरुवातीला अनेकांनी या प्रयोगाकडे संशयाने पाहिले, मात्र आज त्याच प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या त्यांच्या शेतातील चंदनाच्या झाडांची उंची १३ ते १४ फूट झाली असून झाडांची वाढ समाधानकारक आहे. आजच्या घडीला एक झाड बाजारात ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत विकले जाऊ शकते. मात्र अविनाश यादव यांनी अद्याप कोणत्याही झाडाची तोड किंवा विक्री केलेली नाही. आणखी काही वर्षांची प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
१२०० किलो दर
पांढऱ्या चंदनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक कमी पाण्यात आणि ओसाड जमिनीवरही चांगल्या प्रकारे वाढते. लागवडीनंतर पहिलं एक वर्ष झाडांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, त्यानंतर मात्र फारशी देखभाल लागत नाही. साधारणपणे चंदनाचे झाड १५ ते २० फूट उंच वाढते आणि पूर्णपणे तयार होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या बाजारात पांढऱ्या चंदनाला सुमारे १२०० रुपये किलो इतका दर मिळत आहे.
advertisement
१ लाखांचा खर्च
चंदनाला औषधे, साबण, अगरबत्ती, जपमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, हवन साहित्य, अत्तर आणि विविध सुगंधी वस्तूंमध्ये मोठी मागणी आहे. याच मागणीमुळे चंदन शेती ही भविष्यातील फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. अविनाश यादव यांच्या माहितीनुसार एका एकरात सुमारे ४१० चंदनाची रोपे लावता येतात. दोन झाडांमध्ये किमान १० फूट अंतर ठेवणं आवश्यक आहे. एका एकरातील लागवडीसाठी साधारण एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.
advertisement
चंदनाची लागवड कोणत्याही हंगामात करता येते, यासाठी ठराविक ऋतूची अट नाही. मात्र लागवड करताना रोप किमान दोन वर्षांचं असणं महत्त्वाचं आहे आणि पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आज अविनाश यादव यांची चंदन शेती अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून कमी खर्चात, दीर्घकालीन आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या शेतीचा नवा मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 7:44 AM IST








