पासवर्ड बदलणं पडलं महागात, तरुणाला बसला 6 लाखांचा गंडा, चिंचवडमधील घटना
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अधिक परताव्याचे आमिष किंवा विविध कारणांवरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून अनेक नागरिक ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित अॅप्लिकेशनचे पासवर्ड नियमितपणे बदलत असतात.
पुणे : गेल्या काही वर्षांपासून सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिक परताव्याचे आमिष किंवा विविध कारणांवरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून अनेक नागरिक ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित अॅप्लिकेशनचे पासवर्ड नियमितपणे बदलत असतात. मात्र, या प्रक्रियेदरम्यानही फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाच एका घटनेत पिंपरी-चिंचवड परिसरात एका तरुणाची 6 लाख 9 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. अॅप्लिकेशनचा पासवर्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली. ही घटना 7 डिसेंबर 2025 रोजी देहूगाव येथील अभिलाषा पार्क परिसरात घडली आहे.
या फसवणुकीप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाचा सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव श्रीराम रावसाहेब गीते (वय 32, रा. परंडवाल चौक, देहूगाव; मूळगाव चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे आहे. कॅनरा बँक तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेच्या विविध अनोळखी खातेधारकांनी ही फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही घटना घडली होती.
advertisement
नेमकी कशी झाली फसवणूक
फिर्यादी त्यांच्या मोबाइलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे महा मोबाईल प्लस अॅप वापरत असताना त्यांना पासवर्ड अपडेट करण्याची सूचना आली. त्यानंतर नवीन पासवर्ड टाकताच अॅप लॉगआऊट झाले. काही वेळातच त्यांच्या मोबाइलवर विविध व्यवहारांबाबतचे मेसेज येऊ लागले.यानंतर खात्याची तपासणी केली असता, त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 85 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 39 हजार रुपये अशा वेगवेगळ्या रकमा इतर खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. तसेच एटीएम स्वॅपद्वारे 35 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचेही समोर आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:21 AM IST










