रो-रो सेवेचा होणार विस्तार
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कोकणदरम्यान जलवाहतूक अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या पहिल्या रो-रो सेवेची सुरुवात 1 मार्चपासून होणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
नवा मार्ग असणार कोणता?
मात्र आता या सेवेच्या पुढील टप्प्यात मुंबई ते महाड आणि मुंबई ते रत्नागिरी असे नवे मार्ग सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे कोकणातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. सध्या या बोट सेवेच्या तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर आरक्षण सुरू आहे.
advertisement
रो-रो सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि कोकण यांच्यातील अंतर कमी होईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि कृषी व मत्स्य व्यवसायाला फायदा होईल. भविष्यात ही सेवा इतर राज्यांशीही जोडण्याचा विचार सरकार करत आहे.
कधी होणार सुरुवात?
सुरक्षिततेच्या सर्व परवानग्या पूर्ण करून आणि आवश्यक चाचण्या घेतल्यानंतरच ही सेवा सुरू केली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोटीवर डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. समुद्र प्रवासादरम्यान कोणाला त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
