या महिलेविरुद्ध पंतनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या ही महिला पोलीस कोठडीत आहे. तिच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या तिन्ही तरुणींना मानखुर्द येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
अंबरनाथ येथे राहणारी ही महिला ऑनलाईन काही ग्राहकांच्या संपर्कात होती. ती तिच्या जाळ्यात आलेल्या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करायची. त्यांना ग्राहकांसोबत मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये पाठवत असल्याची गोपनीय माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली होती.
advertisement
या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक सापळा रचला. एका बोगस ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी या माहितीची शहानिशा केली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत महिलेला अटक केली आणि तिच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका केली. ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या सेक्स रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
