नेमकी घटना काय होती?
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंग नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाशी धक्का लागला. या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंग यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला बेड्या
हल्ला केल्यानंतर आरोपी गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतले.
लोकलमधील वादातून हत्या की वेगळं कारण?
अटक करण्यात आलेल्या आरोपीला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, तिथे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात केले की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
