जत्रेच्या निमित्ताने परिसरात विविध प्रकारचे स्टॉल उभे राहिले आहेत. खेळण्यांचे, रंगीबेरंगी कि- चैनचे स्टॉल, मालवणी खाजांचे असंख्य गाडे, शिवाय शेवपुरी, भेळपुरी आणि वडापावचे स्टॉल भाविकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत आहेत. पूर्वी जत्रेत दहा मिनिटांचा चित्रपट दाखवणाऱ्या ‘टुरिंग टॉकीज’चा खेळ असायचा; मात्र आता ही परंपरा लोप पावली आहे. तरीही आजही जत्रेला नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी जयवंत जोशी सांगतात. प्रभादेवीचे हे मंदिर सुमारे 1715 ते 1716 च्या सुमारास पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांनी बांधले.
advertisement
मंदिरातील मुख्य देवीची मूर्ती 12 व्या शतकातील असून ती मूळतः शाकंबरी देवी म्हणून ओळखली जात होती. ही देवी देवगिरीच्या यादव राजा बिंबराजाची कुलदेवी होती. प्रभादेवी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेता अनेक मूळ रहिवासी उपनगरात स्थलांतरित झाले असले तरी जत्रेच्या काळात ते आवर्जून देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. आजही जत्रेच्या काळात दोन ते अडीच लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. कडू मेथीची रुजवण करून त्यातून मंदिराचे नाव व जत्रेचे वर्ष आकार देण्याची अनोखी परंपरा आजही जतन केली जात आहे. परंपरा, श्रद्धा आणि उत्सव यांचा संगम असलेली प्रभादेवीची जत्रा आजही मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे.