मुंबईहून या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांसाठी मोठा निर्णय
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने मांडवा, अलिबाग, किहीम, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माथेरान तसेच रायगड किल्ला अशा ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येत असल्याने प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही गर्दी लक्षात घेता आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
जाणून घ्या वाहतूक बदल
31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख महामार्ग आणि राज्यमार्गांवर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वडखळ ते अलिबाग तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक रस्ते अरुंद असल्याने या काळात मोठी वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, पर्यटक तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना होतो.
ही अडचण टाळण्यासाठी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही बंदी जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू असणार नाही. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने या बंदीतून वगळण्यात आली आहेत. तसेच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. ही वाहतूक बंदी 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित तहसीलदार करणार आहेत. अवजड वाहतूक बंद झाल्यास नववर्षाच्या काळात वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे
