जिमी टाटा यांच्याकडे पैशांची काहीही कमी नाही, कारण टाटा सन्सची काही हिस्सेदारी त्यांच्याकडे आहे. जिमी टाटा यांच्याकडे मोबाईलही नाही तसंच ते खूप कमी जणांची भेट घेतात. जिमी यांचं जग बिजनेस आणि कॉर्पोरेट विश्वापासून वेगळं आहे, त्यांनी कधीही टाटाच्या साम्राज्यामध्ये स्वत:ला जोडलं नाही. तसंच कधीही दुसऱ्या व्यवसायामध्येही त्यांनी स्वत:चं नशीब आजमावलं नाही.
advertisement
सोशल मीडिया आणि मोबाईलपासून लांब असलेले जिमी टाटा आधुनिक तंत्राऐवजी पुस्तकं आणि वृत्तपत्र वाचण्यात रमतात. जिमी टाटा घराबाहेरही फार पडत नाहीत, त्यामुळे रतन टाटा यांच्या या छोट्या भावाविषयी फारच कमी जणांना माहिती आहे. त्यांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केली होती. पहिलं लग्न सुनी कमिसरिएटसोबत झालं. या लग्नातून त्यांना रतन आणि जिमी ही दोन मुलं झाली. यानंतर नवल टाटा यांनी दुसरं लग्न सिमोनसोबत झालं, यातून नोएल टाटा यांचा जन्म झाला.
जिमी टाटा आता 83 वर्षांचे आहेत, पण त्यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. अतिशय साधं आणि सरळ आयुष्य जगणारे जिमी टाटा प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहतात. कौटुंबिक व्यवसायामध्येही त्यांनी रूची दाखवली नाही, पण टाटा ग्रुपमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.
काहीच दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी जिमी यांच्या वाढदिवसानिमित्त एक ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो पोस्ट केला होता, त्यामुळे अनेकांना जिमी टाटा यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. 'ते आनंदाचे दिवस होते, आमच्यामध्ये काहीही आलं नाही. 1945 साली माझा भाऊ जिमीसोबत', असं कॅप्शन रतन टाटा यांनी या फोटोला दिलं होतं.
आरपीजी एन्टरप्राईजेजचे अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका यांनी सोशल मीडियावर जिमी यांच्या साध्या राहणीमानाबद्दल एक पोस्ट केली आहे. जिमी मुंबईच्या कुलाबा भागात हॅम्पटन कोर्टच्या सहाव्या मजल्यावर एका साध्या दोन बेडरुमच्या घरात राहतात. जिमी हे उत्कृष्ट स्क्वॉश खेळाडू आहेत.
जिमी टाटा साधं आयुष्य जगत असले तरी ते मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा सन्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टाटा पावर, इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्ससह अनेक टाटा कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी आहे. तसंच ते रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टीही आहेत. हे पद त्यांना 1989 साली वडील नवल टाटा यांच्या मृत्यूनंतर मिळालं होतं.
रतन टाटांचं कुटुंब
सिमोन टाटा - या रतन टाटा यांच्या सावत्र आई आहेत. त्या फ्रान्सिसी-स्विस कॅथलिक आहेत. त्यांचा नवल टाटा यांच्यासोबत 1955 साली विवाह झाला आणि त्या मुंबईमध्ये स्थायीक झाल्या. सिमोन लॅकमेच्या माजी संस्थापकीय संचालक आहेत, तसंच टाटाची कंपनी ट्रेंडमध्ये अध्यक्ष आहेत. सिमोन यांना हिंदुस्तान युनिलिव्हरला लॅकमेच्या विक्रीची देखरेख करणं आणि ट्रेंडच्या विस्ताराचं श्रेय दिलं जातं. ट्रेंड ही वेस्टसाईड आणि झुडियो रिटेल चेनचं प्रबंधन करते.
नोएल टाटा- हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांच्या पत्नी आलू या शापूरजी पालोनजी ऍण्ड कंपनीचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आहेत. आलू यांचे भाऊ सायरस मिस्त्री रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनले होते, पण नंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे उत्तराधिकारी होतील, अशा चर्चा होत्या, पण अखेर एन चंद्रशेखरन यांना या पदासाठी निवडण्यात आलं.
शिरीन आणि डिनीना जीजीभॉय- शिरीन रतन टाटा यांची सावत्र बहीण आहे. त्यांची आई सुनी कमिसरिएट यांनी दुसरं लग्न सर जमशेदजी जीजीभॉय यांच्यासोबत झालं, यातून शिरीन आणि त्यांची दुसरी बहीण गीता यांचा जन्म झाला. गीता यांच्याबाबत सार्वजनिक अशी काहीही माहिती अद्याप समोर लेली नाही. डीनना जीजीभॉय टोरांटोमध्ये राहतात, ज्या शिरीन यांच्या कन्या असून लेखिका आणि फोटोग्राफर आहेत.
लिआह आणि माया- रतन टाटा यांना दोन पुतण्याही आहेत ज्या नोएल टाटा यांच्या मुली आहेत. लिआह इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) सोबत काम करतात तर माया रतन टाटा यांच्या अत्यंत लाडक्या असल्याचं सांगितलं जातं. टाटा नियू ऍप लॉन्च करण्यात माया यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
नेविल टाटा- नोएल यांचे पूत्र नेविल टाटा यांनी मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत लग्न केलं, त्यांना दोन मुलं आहेत. जमशेद टाटा आणि टियाना टाटा. नेविल ट्रेंडच्या झुडियो ब्रॅण्डवर काम करतात, तर मानसी किर्लोस्कर व्यवसायामध्ये लक्ष देतात.
लिआह, माया आणि नेविल यांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचं ट्रस्टी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे, जे टाटा कुटुंबासाठी सामाजिक कार्य करतात.