मुंबईच्या मालाड परिसरात एका व्यक्तीने आपण ज्योतिष असल्याचं भाषवत एका महिलेचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केलं आहे. त्याने पीडितेकडून तब्बल ३३ लाख रुपये लुटले आहेत. आरोपीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित महिलेशी संपर्क साधून ओळख वाढवली होती. तिचा विश्वास जिंकत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर महागावकर (रा. मीरा रोड) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सुरुवातीला आरोपीने स्वतःला ज्योतिषी असल्याचे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला होता. मात्र, पुढील तपासात हा प्रकार सोशल मीडियावरील ओळखीपासून सुरू झाल्याचे उघड झाले आहे. फेब्रुवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान फेसबुकवरून दोघांची ओळख झाली होती. बोरिवली परिसरातील ही महिला हळूहळू आरोपीच्या जवळ येत गेली आणि त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीनं तिला भेटण्यासाठी तयार केलं.
आरोपीने महिलेला मार्वे बीच येथे बोलावलं. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान आरोपीने अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच आत्महत्येची धमकी देऊन मानसिक दबावही निर्माण करण्यात आला. सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेनं आरोपीला टप्प्याटप्प्याने सुमारे ३३ लाख रुपये दिले. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही.
अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सायबर क्राईम, लैंगिक शोषण आणि खंडणी उकळण्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गंभीर प्रकार असल्याचे समोर आले आहे पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केली त्याच्याविरोधात आयटी अॅक्ट, बलात्कार, तसेच ब्लॅकमेलिंगसारख्या गंभीर BNS कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे
