मालाडमधील प्रोफेसरच्या हत्येची ही घटना ताजी असतानाच, आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली नावाच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून झाल्याचे समजतं. हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल २२ वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
advertisement
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमांमुळे आणि अतिरक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. आरोपींची ओळख पटवली जात आहे. शंकरचे कोणासोबत वाद होते का? या दिशेने देखील पोलीस चौकशी करत आहेत.
