नेमकं घडलं काय?
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘तुमच्या जीवाला धोका’ असल्याचा बनाव करत फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2026 या काळात फसवणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणात संबंधित भोंदूबाबाविरोधात तरुणीने तक्रार दाखल केली.
advertisement
भीती घातली अन्...
मंजुनाथ शेट्टी याने सामाजिक ओळखीचा फायदा घेत कुटुंबाचा विश्वास संपादन केला. कुटुंबांना अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवून भीती घातली. तसेच यावर उपाय म्हणून केरळच्या पुजाऱ्यामार्फत पूजाविधी आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल 2024 या काळात 10 लाख रुपये रोख घेतले, असं तक्रारीत नमूद आहे.
पैशांची मागणी
दरम्यान, यानंतर पैशांची मागणी वाढत गेली. वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत पैशांची मागणी सुरू राहिली. न्यायालयीन प्रकरणे, अपुरे पूजाविधी आणि भविष्यातील संकटांची तो भीती घालत होता. मे 2024 ते जानेवारी 2026 या काळात त्याने 1.56 कोटी रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले. असे एकूण 1 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित कुटुंबाने कासारवडवली पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
