मुंबई : मुंबईतील बोरिवली पूर्व येथील कस्तुरबा पोलिसांनी अवघ्या चार तासांत दोन कुख्यात चोरट्यांना जेरबंद करून एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांवर हल्ला करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून नेणाऱ्या या टोळीतील दोन गुन्हेगारांना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पकडले.
२२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मागाठाणे पुलाजवळ एका व्यक्तीवर अचानक हल्ला करून चोरट्यांनी त्याच्याकडील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून कस्तुरबा पोलिस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
चार तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अल्पावधीतच आरोपींचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी विशेष पथक तयार करून दहिसर आणि बोरिवली परिसरात सापळा रचला. अखेर केवळ चार तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समीर हसन शेख (२४) आणि सुजल संतोष चौहान (२१) अशी असून ते दोघेही स्थानिक गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली सोन्याची साखळी आणि ओप्पो मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.
बोरिवली परिसरात वारंवार चोरीच्या घटना
या घटनेमुळे कस्तुरबा पोलिसांचे कौतुक होत असून नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे. अल्पावधीत गुन्हेगारांना जेरबंद करून चोरीचा माल हस्तगत करण्याचे यश पोलिसांनी मिळवले. पुढील तपास सुरू असून आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. बोरिवली परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना या कारवाईमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.