अलका अज्जींचा प्रवास पाहता तो सहजसोपा वाटला तरी त्यामागे असंख्य मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास आहे. वयाच्या 45व्या वर्षापर्यंत त्या एका गृहिणी म्हणून घर, संसार आणि जबाबदाऱ्या उत्तम रीतीने सांभाळत होत्या. मुलीचे लग्न होऊन संसारात स्थैर्य आल्यावर त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावेसे वाटले. घरगुती पातळीवर योगाचे वर्ग सुरू केले, त्यातून वजन कमी होऊ लागले आणि शरीरात हलकेपणा जाणवू लागला. योगासनांमध्ये सुधारणा होताच त्यांनी स्पर्धात्मक योगाभ्यासाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
Navratri 2025 : गरबा खेळताना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतोय? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला सल्ला
सुरुवातीला जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेताना त्यांना दुसरा-तिसरा क्रमांक मिळत होता. पण त्याचबरोबर अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली. पहिला क्रमांक मिळवायचा असेल तर सातत्य ठेवावे लागेल आणि शरीर अधिक सशक्त करावे लागेल, असा निर्धार करून अलका अज्जींनी दिवसातून दोन वेळा आसनांचा सराव सुरू केला. हळूहळू त्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. या सर्व प्रवासात त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सातत्यपूर्ण परिश्रमामुळे एकामागोमाग एक सुवर्णपदके मिळत गेली आणि आज त्यांची सुवर्णपदकांची संख्या 200 च्या पुढे पोहोचली आहे.
योगातील त्यांच्या अथक प्रयत्नांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले. त्यांना भारत योगरत्न पुरस्कार मिळाला, तसेच योग विषयातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय विविध स्तरांवरील 25 हून अधिक मोठे पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत.
अलका अज्जी ग्रामीण भागातील एका साध्या मराठी कुटुंबातून आल्या आहेत. पारंपरिक मराठी कुटुंबातील स्त्री, डोक्यावर पदर घेणारी, अशी त्यांची प्रतिमा होती. अशा पार्श्वभूमीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणे हे आव्हानात्मक होते. परंतु घरच्यांचा उत्तम पाठिंबा आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी अडचणींवर मात केली.
आज अलका जाधव या फक्त स्पर्धांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. परदेशात देखील अनेक जण त्यांच्याकडून ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून योग शिकत आहेत. योग ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून, जीवन जगण्याची कला आहे, हे त्या प्रत्येकाला पटवून देतात. त्यांचा प्रवास हा फक्त योगातील प्रावीण्याचा नाही, तर आत्मविश्वास, सातत्य आणि मेहनतीने अशक्य गोष्टी साध्य करता येतात याचा संदेश देणारा आहे. वयाच्या उत्तरार्धातही जीवनात नवी सुरुवात करता येते, याचा आदर्श त्या आजच्या पिढीसमोर ठेवतात.
अलका अज्जींचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतरही स्वतःच्या आवडी-निवडी जपता येतात आणि मेहनतीने त्यात सर्वोच्च स्थान मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.