रेल्वे जंक्शनबाहेर उभं राहणार स्वतंत्र बेस्ट बस लेन
रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा, फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे बेस्ट बसला मार्ग काढणे कठीण होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुर्ला पूर्वेकडे ठाण्याच्या धर्तीवर सॅटिस उभारण्यात येणार आहे.
सॅटिस म्हणजे नेमकं काय?
या सॅटिसवरून केवळ बेस्ट बसचीच वाहतूक केली जाणार असून त्यामुळे बसचा प्रवास कोंडीमुक्त होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एल वॉर्डला भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली असून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. कुर्ला पूर्वेकडील बेस्ट बस आगार ते एस. जी. बर्वे मार्गादरम्यान सुमारे अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा हा सॅटिस पूल असणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
advertisement
पावसाळ्यातील कोंडीवर तोडगा, सॅटिसवर बस सेवा सुरु
सध्या या परिसरात मोठ्या आणि लांब बसगाड्यांना वळण घेणे अवघड जाते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते. सॅटिस उभारल्यानंतर बस थांबेही त्यावरच तयार केले जातील. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच प्रवाशांना सॅटिसखाली बस सेवा उपलब्ध होईल.
याशिवाय सॅटिसच्या एका बाजूला इतर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. रिक्षा थांबा थोडा दूर हलवण्याचे नियोजन असून अनधिकृत दुकाने आणि वाढीव बांधकामे हटवून रस्त्याचे रुंदीकरणही केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कुर्ला पूर्वेकडील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
