मुंबई: मुंबईचा पहिला डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी मस्तानचं नाव अलीकडे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे हाजी मस्तान यांची लेक हसीन मस्तान मिर्झा. 2025 च्या डिसेंबर महिन्यात हसीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता ज्यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मदत मागितली होती. लहानपणी झालेला अत्याचार, छळ आणि अन्यायाविरोधात न्याय मिळावा, यासाठी हसीन मस्तानने मोदी-शाहांचं दार ठोठावलं होतं. यानंतर 21 जानेवारी 2026 रोजी हसीनने थेट दिल्लीत दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांना पत्रं दिली होती. तिच्यावर झालेल्या अन्यायाची संपूर्ण माहिती तिने या पत्रांमार्फत मांडली.
advertisement
दिल्लीवारी होताच मुंबईत येऊन हसीनने न्याय मिळावा म्हणून आता कोर्टात देखील धाव घेतली आहे. आपल्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा तसेच पतीने संपत्ती बळकावल्याचा आरोप करत हसीन मस्तान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण पुन्हा सुरू करण्यात यावं, अशी मागणी तिने कोर्टाकडे केली आहे.
काय घेतला निर्णय?
हसीन मस्तानच्या म्हणण्यानुसार, 2013 साली ती पहिल्यांदा कोर्टात गेली होती. मात्र आरोपी कधीच कोर्टात हजर राहिला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2017 नंतर प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हसीना स्वत:ही अनेक सुनावण्यांना गैरहजर राहिली. अखेर 2023 साली दोन्ही पक्षकार सुनावणीला उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही केस बंद केल्याची माहिती हसीन मस्तान यांनी दिली आहे. आता तब्येत सुधारल्यानंतर आणि नव्याने धैर्य एकवटत, हसीन मस्तानने ही केस पुन्हा लढण्याचा निर्णय घेतली आहे.
नेमकं काय म्हटलं याचिकेत?
हसीन मस्तान यांच्या या प्रकरणाची कायदेशीर बाजू अॅड. आशिष दीप वर्मा लढवत आहेत. हसीन मस्तान यांच्यावर अल्पवयात झालेला अत्याचार, बेकायदेशीर लग्न, तसेच घटस्फोटानंतर संपत्ती आणि कागदपत्रे हडप केल्याचे आरोप गंभीर स्वरूपाचे असून, या प्रकरणाचा नव्याने आणि सखोल विचार व्हावा, अशी भूमिका याचिकेद्वारे मांडण्यात आली आहे.
हसीन मस्तान सोबत काय घडलं?
हसीन मस्तान यांच्या म्हणण्यानुसार, 1996 साली वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी मामाच्या मुलाशी तीचं लग्न लावून देण्यात आलं. याआधीच आपल्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचा गंभीर दावा हसीनने केला असून, त्याच कारणामुळे हे लग्न लावून देण्यात आल्याचं ती सांगते. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच, वयाच्या तेराव्या वर्षी हसीन यांना पहिलं अपत्य झालं. पतीकडून वारंवार शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोपही हसीनने केला आहे. 2010 साली हसीन आणि तिचा पती नासिर यांचा घटस्फोट झाला. मात्र घटस्फोटानंतर नासिर याने हसीनची संपत्ती आणि महत्त्वाची कागदपत्रे बळकावल्याचा आरोप तीने केला असून, हा आपली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याचंही हसीनचं म्हणणं आहे. पुढे 2013 साली हसीन मस्तान हीने पोलिसांत तक्रार दाखल करत थेट न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आरोपी पती नासिर कधीच कोर्टात हजर राहिला नसल्याचा दावा हसीन यांनी केला आहे. 2017 नंतर प्रकृती खालावल्यामुळे त्या स्वतःही नियमितपणे सुनावणीला उपस्थित राहू शकली नाही आणि अखेर 2023 साली न्यायालयाने ही केस बंद केली.
