एका सोन्याच्या पाणासाठी चिमुरड्याच्या जिवाशी खेळ
सुनील डोंबाळे हे कळंबोली सेक्टर-1 परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा पाच वर्षीय मुलगा घरासमोरच्या गल्लीत नेहमीप्रमाणे खेळत होता. परिसर परिचित असल्याने कुटुंबीयांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवले नव्हते. मात्र याच संधीचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने मुलाजवळ येत त्याच्याशी बोलण्याचा बहाणा केला.
क्षणातच त्या व्यक्तीने मुलाच्या गळ्यातील काळा धागा कापला. या धाग्यात सुमारे साडेचार हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान अडकवलेले होते. चोरी केल्यानंतर ती व्यक्ती तात्काळ घटनास्थळावरून पळून गेली. मुलाला नेमके काय घडले हे सुरुवातीला कळले नाही. काही वेळाने गळ्यातील धागा नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाने रडत घरी येऊन प्रकार सांगितला.
advertisement
यानंतर पालकांनी परिसरात शोध घेतला मात्र संशयिताचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर या घटनेची माहिती कळंबोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
