L1 हा एक सोयीचा बिंदू असून, तो पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी आणि सूर्यापासून सुमारे 148.5 दशलक्ष किमी अंतरावर आहे. या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्णपणे संतुलित आहे. या मिशनमध्ये सात पेलोड्स ऑनबोर्ड आहेत आणि व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनग्राफ म्हणजेच व्हीईएलसी हा पेलोड प्राथमिक आहे. बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) येथील प्रो. रमेश आर. आणि त्यांच्या टीमनं तो विकसित आणि डिझाईन केला आहे.
advertisement
न्यूज18 ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, प्रो. रमेश आर. यांनी मिशनचं महत्त्व आणि पृथ्वीवरील जीवनाच्या अनेक पैलूंवर त्याचा कसा परिणाम होईल हे स्पष्ट केलं आहे.
L1 पॉईंट म्हणजे काय आणि इस्रोनं त्याची निवड का केली?
इस्रो आणि भारतातील खगोलभौतिकशास्त्रज्ञांनी (अॅस्ट्रोफिजिसिस्ट्स) आतापर्यंत पृथ्वीवरून सूर्याचा अभ्यास केला आहे. जमिनीवर राहून निरीक्षण करण्याला दोन मर्यादा आहेत - ते फक्त पहाटेपासून संध्याकाळपर्यंत केलं जाऊ शकतं आणि वातावरणातील धुळीच्या कणांचा अभ्यासाच्या निष्कर्षांवर परिणाम होतो. सूर्याचा सतत अभ्यास करता यावा यासाठी, इस्रोनं 2013 मध्ये अंतराळातील लँगरेज पॉईट 1वर पेलोड पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
प्रो. रमेश आर. म्हणाले, "L1 पॉईंट समजून घेताना हे साधं उदाहरण उपयुक्त ठरेल. जर आपण सूर्य आणि पृथ्वीचा समावेश असलेल्या सौरमंडळाला एक विशाल शरीर मानलं तर त्यात पाच वाँटेज पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सवर सूर्य आणि पृथ्वी दोघांमधील गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्णपणे संतुलित आहे. इटालियन खगोलशास्त्रज्ञ जोसेफ लँगरेज यांनी प्रथम या पाच बिंदूंचा शोध लावल्यामुळे त्यांना लँगरेज पॉईंट्स असं म्हणतात. L1 हा सूर्य आणि पृथ्वीच्या सरळ रेषेत आहे. हा एक स्थिर गुरुत्वाकर्षण बिंदू आहे जिथून सूर्याचं अखंड दृश्य दिसतं. हे ठिकाण पृथ्वीपासून पुरेसं दूर असल्यामुळे वातावरणातील धुळीची अडचण तिथे येणार नाही. मिशनची रचना करण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण आहे."
आदित्य-L1 सौरज्वाळांचा आणि कोरोनल मास इजेक्शनचा अंदाज लावण्यास मदत करेल का?
मार्च 1989 मधील सौरवादळाचा एक भाग असलेल्या भूचुंबकीय (जिओमॅग्नेटिक) वादळानं कॅनडातील क्यूबेक प्रांतातील वीज पारेषण प्रणालीवर गंभीर परिणाम केला होता. सौर हवामानाच्या चांगल्या अंदाजासाठी शास्त्रज्ञ कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) आणि सौरज्वाळांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रो. रमेश आर. म्हणाले, "सूर्याच्या वातावरणातून रौद्र उद्रेक होऊ शकतात आणि ते पृथ्वीच्या दिशेनं येऊ शकतात. त्यामुळे अभ्यास करून त्यावर 24 तास देखरेख ठेवण्याची गरज आहे. या सर्व रौद्र उद्रेकाचा प्राथमिक स्रोत सूर्याचा कोरोना आहे आणि आमचा प्राथमिक पेलोड त्याकडे लक्ष ठेवेल. आम्ही दर मिनिटाला त्याचा एक फोटो क्लिक करू. अशाप्रकारे दररोज 1 हजार 440 फोटो मिळतील आणि कोणत्याही लहान बदलांचा अभ्यास करणं शक्य होईल. आम्ही पोलारिमीटर नावाचं उपकरणदेखील यानासोबत पाठवत आहोत. ते चुंबकीय क्षेत्रातील बदलांचं निरीक्षण करणार आहे. हे उपकरण रौद्र सौर उद्रेकाची पूर्वसूचना देऊ शकतं."
शास्त्रज्ञांच्या समुदायाला आशा आहे की, आदित्य-L1 मिशनच्या शेवटी सीएमईची भविष्यवाणी करण्यासाठी आपण शोधत असलेले सौरसंकेत समजून घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा डेटा असेल.
ते म्हणाले, "सूर्याच्या डिस्कच्या मध्यभागी असलेल्या सौरडागांचा चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे उद्रेक झाल्यास, ते थेट सूर्यापासून पृथ्वीकडे प्रवास करतील. त्यामुळे, सौर डिस्कजवळील सौरडाग संभाव्यतः अधिक भू-प्रभावी आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी विशिष्ट डेटाबेसचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. यामध्ये सौरडागांचा आकार किंवा दिसणं किंवा ध्रुवता महत्त्वाची आहे. सीएमई हे सौरडागांभोवती असलेल्या सूर्याच्या कोरोनापासून प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्रांचं मोठ्या प्रमाणावर एक्सपल्शन्स करतात. ते एम्बेडेड चुंबकीय क्षेत्रासह कोरोनल मटेरियल बाहेर काढतात. सौरज्वाळा म्हणजे सूर्यापासून तयार होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्फोट आहेत. ते वेगानं प्रवास करतात. हे दोन्ही घटक अंतराळातील सॅटेलाईट्स, दळणवळण आणि पृथ्वीवरील पॉवर लाइन्सच्या कार्यावर परिणाम करू शकतात."
इस्रोची आदित्य एल-वन ही मोहीम आज सुरू होत आहे. ती यशस्वी होईल आणि भारतीय शास्त्रज्ञांना सूर्याच्या अभ्यासासाठी पुरेसा डेटा उपलब्ध होईल अशी अपेक्षा करूया.
