केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी न्यूज18 इंडियाला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 11 वर्षांचे काम ऐतिहासिक असल्याचं वर्णन केलं. पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की भारताला याचा फायदा झाला आहे. गेल्या 11 वर्षात दहशतवाद नियंत्रित करण्यासाठी आणि "काश्मीर आमचा आहे" ही भावना बळकट करण्यासाठी केलेलं काम शतकानुशतके लक्षात राहील, असं अमित शाह म्हणाले.
advertisement
'जीएसटी 2.0 मुळे सगळ्यांना फायदा'
जीएसटीच्या कर रचनेत बदल करण्यात आला आहे. यामुळे 16 प्रकारच्या करांची एकसंध रचना निर्माण झाली आहे आणि निर्यातीला चालना मिळेल. इतकी मोठी कर कपात गेल्या काही वर्षांत कधीही झालेली नाही. यामुळे बाजारपेठ आणि गुंतवणूक दोन्ही वाढेल, असंही अमित शाह म्हणाले.
'मोदी इतकं काम कोणत्या पंतप्रधानांनी केलं नाही'
'नेहरू, इंदिरा आणि मोदी या सर्वांनी योगदान दिलं, परंतु मोदींनी केवळ गरिबी हटवण्यासाठी घोषणा दिल्या नाहीत तर त्या जमिनीवर अंमलात आणल्या. गेल्या दशकात मोदींनी जितकं काम केलं तितकं इतर कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाही' असा दावाही अमित शाह यांनी केला.
तसंच, अमित शाह यांनी कोविड-१९ विरुद्धच्या लढाईला एक मोठी उपलब्धी म्हणून वर्णन केले आणि दहशतवादाविरुद्ध मोदी सरकारच्या शून्य-सहिष्णुता धोरणाची उदाहरणे म्हणून ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांचा उल्लेख केला.