जुन्या वादातून हा सूड घेतल्याचा दावा त्याने या व्हिडिओमध्ये केला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली होती. मौजपुरमधील 'मिस्टर किंग लाउंज अँड कॅफे'मध्ये बुधवारी रात्री उशिरा अचानक गोळीबाराचा आवाज घुमला. या गोळीबारात फैजान उर्फ फज्जी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, जो वेलकम परिसरातील रहिवासी होता. मोईन कुरेशीने व्हिडिओत सांगितले की, फैजानने 4 महिन्यांपूर्वी त्याला कानाखाली मारली होती, त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने फैजानचा जीव घेतला. या कृत्यात त्याच्या कुटुंबाचा किंवा पैशांचा कोणताही संबंध नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
advertisement
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 जानेवारीच्या रात्री 10:28 वाजता घडली. गोळीबाराची माहिती मिळताच वेलकम पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फैजानला तातडीने जीटीबी हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे लाउंजमध्ये असलेल्या ग्राहकांमध्ये मोठी पळापळ झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रिकाम्या पुंगळ्या आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, हल्लेखोर कॅफेमध्ये शिरल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी थेट फैजानला लक्ष्य केले. सपासप गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. पोलिसांनी आता मोईन कुरेशीच्या व्हिडिओची दखल घेतली असून त्या दिशेने तपास अधिक तीव्र केला आहे.
