वाराणसी, 5 सप्टेंबर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिन हा संपूर्ण देशभरात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन याचे वाराणसी आणि बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीसोबत संस्मरणीय असे नाते आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 9 वर्षे बीएचयूचे कुलगुरू होते. महामना मदन मोहन मालवीय यांच्या आग्रहाने त्यांनी बीएचयूच्या कुलगुरू पदाचा पदभार सांभाळला होता.
advertisement
बीएचयूचे माजी प्राध्यापक कौशल किशोर मिश्र यांनी सांगितले की, बीएचयूच्या कुलगुरू पदाचा पदभार स्विकारल्यानंतर ते आठवड्यातून फक्त दोन दिवस विद्यापीठात यायचे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी ते कोलकाताहून रेल्वेने येथे यायचे आणि दोन दिवस विद्यापीठाचे कामकाज पाहिल्यावर परत जायचे.
सॅलरी किती -
ते तब्बल 9 वर्षे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. विशेष म्हणजे एक मजेशीर गोष्ट अशी की, या कालावधीत त्यांनी फक्त 1 रुपये सॅलरी घेत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्विकारला. विद्यापीठाच्या प्रती त्यांचा असलेला समर्पण भाव आणि सेवाभाव या कारणामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते. इतकेच नव्हे तर त्यांना याच कामांमुळे आजपर्यंतचे सर्वश्रेष्ठ कुलगुरू म्हणून मानले जाते.
इंग्रजांना रोखले -
प्राध्यापक प्रवीण सिंह राणा यांनी सांगितले की, 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन विरोधात संपूर्ण देशात विरोध सुरू होता. बीएचयूमध्येही इंग्रजांनो भारत सोडा, या आंदोलनाअंतर्गत विरोध प्रदर्शन सुरू होते. या दरम्यान, इंग्रजांनी याठिकाणी आंदोलकांना अटक करण्यासाठी विद्यापीठात प्रवेश करायचे ठरवले. मात्र, त्यावेळचे कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना विद्यापीठात येण्यापासून रोखले. यामुळे आंदोलकांना अटक न करता त्यांना इंग्रजांना परत जावे लागले.