नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी या एअर अॅम्ब्युलन्सचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) असलेला संपर्क अचानक तुटला. विमान रडारवरून गायब झाल्याचे लक्षात येताच विमान अधिकाऱ्यांनी तातडीने हाय अलर्ट जारी केला. शोधमोहीम राबवली असता, हे विमान चतरा जिल्ह्यातील घनदाट जंगलात कोसळल्याचं निष्पन्न झालं.
अपघातग्रस्त विमानात कोण कोण होतं?
advertisement
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले संजय कुमार (४१) या रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेले दोन अटेंडंट अर्चना देवी आणि धुरु कुमार, डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा आणि दोन पायलट कॅप्टन विवेक विकास बिलागत आणि कॅप्टन सवरदीप सिंह यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
उपचारासाठी चालली होती धडपड
मयत रुग्ण संजय कुमार हे रांचीच्या देवकमल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. एका पेट्रोलियम पदार्थामुळे लागलेल्या आगीत ते ६३ टक्के भाजले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील 'हायर सेंटर'मध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता संजय कुमार यांना रुग्णालयातून हलवण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने, जीवन वाचवण्यासाठी सुरू असलेला हा प्रवास ७ जणांचा बळी घेऊन थांबला.
रेस्क्यू ऑपरेशन आणि तपास
डीजीसीएने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, वाराणसीपासून १०० नॉटिकल मैल दक्षिण-पूर्वेस विमानाचा संपर्क तुटला होता. चतरा जिल्ह्याचे एसपी सुमित कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, प्रशासकीय टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य पूर्ण करण्यात आलं आहे. दरम्यान, या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) कडे तपास सोपवण्यात आला आहे. खराब रस्ते आणि घनदाट जंगल असल्याने मदतकार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले होते.
