ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि पेड्डाकुरापाडू रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनमध्ये घडली. ३५ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजमहेंद्रवरम येथील रहिवासी असलेली पीडित महिला चारलापल्लीला जाण्यासाठी 'संत्रागाची स्पेशल एक्स्प्रेस'मध्ये चढली होती. ती महिलांसाठी असलेल्या राखीव डब्यातून प्रवास करत होती. ती डब्यात एकटीच होती. दरम्यान, ट्रेन गुंटूर रेल्वे स्थानकावर थांबली असता, अंदाजे ४० वर्षीय एक अज्ञात व्यक्ती डब्याजवळ आला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पीडित महिलेला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडताच तो व्यक्ती डब्यात शिरला.
advertisement
गुंटूर रेल्वे स्थानक आणि पेड्डाकुरापाडू रेल्वे स्थानकांदरम्यान, या अज्ञात व्यक्तीने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. नराधमाने केवळ अत्याचारच केला नाही, तर त्याने पीडित महिलेला मारहाण करून तिच्याकडील ५ हजार ६०० रुपये रोख आणि तिचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला.
ट्रेन पेड्डाकुरापाडू रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत असतानाच आरोपीने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि तो अंधारात पळून गेला. या घटनेमुळे पीडित महिला पूर्णपणे हादरली. पीडितेने या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध घेत आहेत. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.